‘स्वतःच्या अंगावरचं ‘ते’ रक्त आधी पुसा’, तृप्ती देवरुखकर प्रकरणावरून नितेश राणे यांची सडकून टीका
VIDEO | उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील खासदार संजय राऊत यांनी मुलुंड घटनेला भाजप आणि एकनाथ शिंदे हे जबाबदार आहेत, अशी टीका केली होती. या टीकेवरून भाजप नेते नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'स्वतःच्या अंगावर मराठी माणसाच्या भविष्याचं खून करून बरबटलेले रक्त आहे, ते आधी पुसा'
मुंबई, २९ सप्टेंबर २०२३ | मुलुंड घटनेला जबाबदार भाजप आणि शिंदे आहेत असे बोलण्याअगोदर संजय राऊत यांना लाज वाटली पाहिजे, असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत यांना चांगलंच फटकारलं आहे. मुंबईतला मराठी माणसाचा टक्का का घसरला, इतकी वर्षे मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांची सत्ता होती ना? मग मुंबईतला मराठी माणूस मीरा रोड, वसई, विरार, भाईंदर आणि कल्याण-डोंबिवली या ठिकाणी का रहायला गेला? असा सवाल नितेश राणे यांनी संजय राऊत यांनी विचारला आहे. पुढे ते असेही म्हणाले, मराठी माणसाला मुंबईमध्ये घर का घ्यावेसे वाटले नाही, का त्याला आर्थिक सक्षम केलं नाही, का वडापावच्या गाडी पूरतं ठेवलं, पत्राचाळमध्ये का मराठी माणसं राहत नव्हती, एअर इंडियामध्ये मराठी कामगार काम करत नव्हते का? याला जबाबदार कोण? स्वतःच्या अंगावर मराठी माणसाच्या भविष्याचं खून करून बरबटलेले रक्त आहे, ते आधी पुसा आणि मग भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करून बोट ठेवा, असं म्हणत नितेश राणे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे.