लोकसभेसाठी ‘मनसे’ला कुठली जागा मिळणार? भाजप नेत्यानं स्पष्टच सांगितलं
राज ठाकरे स्वत: दिल्लीला जाऊन अमित शाहना भेटून आले. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर कालरात्री गुप्त बैठक झाली. आता वांद्रयाच्या ताज लॅन्डस हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात बैठक झाली. यादरम्यान, भाजपा नेत्याने लोकसभेसाठी 'मनसे'ला कुठली जागा मिळणार? हे स्पष्टपणे सांगितलंय
मुंबई, २१ मार्च २०२४ : गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेची युती होणार, मनसे हा पक्ष महायुतीत येणार अशा चर्चा चांगल्याच रंगताना दिसताय. अशातच राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी देखील होताना दिसताय. मात्र दोन-तीन दिवसांपासून त्या संदर्भातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. राज ठाकरे स्वत: दिल्लीला जाऊन अमित शाहना भेटून आले. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर कालरात्री गुप्त बैठक झाली. आता वांद्रयाच्या ताज लॅन्डस हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात बैठक झाली. यादरम्यान, भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी मनसेच्या महायुतीमधील समावेशाबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘राज ठाकरे महायुतीमध्ये आल्यास निश्चित महाराष्ट्राच्या जनतेला हा निर्णय आवडेल. बाळासाहेबांची हिंदुत्वाची विचारधारा पुढे घेऊन जाण्याच काम राज ठाकरे करत आहेत. त्यांचे आमचे सूर जमतायत असे संकेत देवेंद्रजींनी दिले होते. त्यांनी आता व्यापक हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली आहे. राज ठाकरे सोबत आले, तर आनंदच आहे’, तर भाजपामध्ये जे पक्ष आले, त्यांना सामील करुन घेतलं, त्यांचा सन्मान केला. कुठली जागा द्यायची हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. परंतु त्यांचा सन्मान निश्चित होईल, असेही दरेकर म्हणाले.