‘दादा आल्यानं नुकसान नाही तर ठाकरेंनी आम्हाला धोका दिला अन्..’, भाजप मंत्र्याचंच बेधडक वक्तव्य
उद्धव ठाकरे महायुतीला सोडून गेल्यानं भाजपचं नुकसान झालं, अशी कबुली दानवेंनी दिली. मात्र अचानक दानवे असं का बोलले, यामागे नेमकं टायमिंग काय ? अशी चर्चा सुरु झाली. भाजपचे नेते रावसाहेब दानवेंचं हे वक्तव्य फार मोठं आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
अजित पवारांच्या येण्यामुळं भाजपचं नुकसान झालं नाही.. तर उद्धव ठाकरे धोका देवून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्यानं आमचं नुकसान झालं, असं बेधडकपणे रावसाहेब म्हणालेत. TV9 शी बोलताना, दानवेंनी ठाकरेंबद्दल धोका शब्द वापरला. तर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतही दानवेंनी उद्धव ठाकरेंमुळंच भाजपचं नुकसान झाल्याचं म्हटलं. लोकसभा निवडणुकीत अजित पवार आमच्यासोबत येण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या जाण्याचा आम्हाला खूप फटका बसला. महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर महाराष्ट्रात थेट लोकसभेचीच सार्वत्रिक निवडणूक झाली. ज्यात महाराष्ट्रानं महाविकास आघाडीलाच पसंती दिली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अधिक फायदा झाला. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी महाविकास आघाडीला 30 आणि सांगलीत मूळ काँग्रेसचेच पण अपक्ष लढलेले विशाल पाटील विजयी झाले आता ते काँग्रेससोबतच आहेत. म्हणजेच मविआचा आकडा 31 वर गेलाय तर महायुती अवघ्या 17 जागांवर आटोपली. रावसाहेब दानवे फक्त भाजपचेच नेते नाहीत..तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं त्यांना, निवडणूक संचालन समितीचं प्रदेश संयोजक केलंय. म्हणजे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या बरोबरीचं पद दानवेंना दिलंय. अशा वेळी, उद्धव ठाकरेंमुळं भाजपचं नुकसान असं बोलणं म्हणजे, महाविकास आघाडीला आयतीचं संधी देणं आहे.