Vinod Tawade : विधानसभेला भाजपच्या किती जागा येणार?, कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं…
विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे. अशातच कोणत्या पक्षाचे किती उमेदवार विधानसभा निवडणुकीत जिंकणार? सत्तेच्या पारड्यात कोण असणार? महायुती की महाविकास आघाडी? कोण होणार मुख्यमंत्री? यासंदर्भात राज्यातील मतदारांसह राजकीय वर्तुळातील नेत्यांमध्ये चर्चा आणि अंदाज बांधला जात आहे.
विधानसभा निवडणुकीला हातावर मोजण्याइतके दिवस शिल्लक राहिले असताना राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला अशातच भाजप नेते विनोद तावडे यांनी टीव्ही ९ मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत यावर भाष्य केलं. ‘उद्धव ठाकरेंना लोकसभेत सहानुभूती मिळाली हे चूक आहे. त्यांनी २०१९ ला गद्दारी केली हे लोकांच्या मनात पक्कं आहे’, असं म्हणत यंदा भाजप ९५ ते ११० जागांपर्यंत जाईल. शिवसेना शिंदे गट ४५ ते ५५ जागा जिंकेल. राष्ट्रवादी अजित पवार गट २५ ते ३० जागा जिंकेल. तर संपर्ण महायुती मिळून १६५ ते १७० पर्यंत जाऊ, असा अंदाज विनोद तावडे यांनी व्यक्त केला. दरम्यान, राज्यात महायुतीची सत्ता आली तर कोण मुख्यमंत्री होणार? या प्रश्नावर बोलताना तावडे म्हणाले, मुख्यमंत्रिपदाची चर्चा निवडणुकीनंतर करू असं पक्षाने ठरवलं आहे. संख्याबळावर मुख्यमंत्री ठरणार नाही. निवडणुकीनंतर बसवून ठरवू. ज्याचे आमदार जास्त तो होईल किंवा बिहारमध्ये आम्ही नितीश कुमार केले. आमचे आमदार जास्त पण नितीश कुमार झाले. पण त्या त्यावेळच्या राजकीय परिस्थितीवर लक्षात घेऊन करावं लागेल. महाराष्ट्राच्या हिताचं पाहून निर्णय घ्यावा लागेल, असं विनोद तावडे म्हणालेत.