Pankaja Munde : ‘कुणी पैसे काढून घेत असेल तर…’, लाडक्या बहिणींना पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
जालन्यातील बदनापूर तालुक्यातील आन्वी गावात आश्रमशाळेच्या वसतीगृहाच्या भूमीपूजनासाठी पंकजा मुंडे आज आल्या होत्या. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले.
महिलांना ताकद देण्याचं काम केलं म्हणून आम्ही सरकारमध्ये आहोत, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले आहे. महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्याने लाडक्या बहिणींच्या बँक अकाऊंटमध्ये चार पैसे आले आणि त्यामुळे महिलांची इज्जत वाढली असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. तर कुणी पैसे काढून घेत असेल तर मला सांगा, असं वक्तव्य करत पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आवाहन केलं आहे. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील आन्वी गावातील एका भाषणात पंकजा मुंडेंनी हे वक्तव्य केलंय.
आन्वी गावातील आश्रमशाळेच्या वसतीगृहाच्या भूमीपूजनासाठी पंकजा मुंडे आल्या होत्या. ‘जर घरात कोणी जास्त धाक दाखवायला लागलं तर सांगायचं मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात या लाडकी बहीण योजनेमुळे चार पैसे आले. या लाडकी बहीण योजनेचे आलेले पैसे कोणी काढून तर घेत नाही ना? काढून घेतले तर मला सांगा. काष्टा घातलेल्या माऊलीच्या खात्यातही लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आणि सहावारी घातलेल्या महिलेल्या खात्यात पैसे आलेत’, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पुढे त्या असेही म्हणाल्या, अशा महिलांना ताकद देण्याचे काम आम्ही केलं म्हणून या सरकारमध्ये आम्ही पुन्हा या मंचावर सरकारमध्ये बसलेलो आहोत, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.