तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? नितेश राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?
हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात उत्तम जानकर यांनी जोरदार फटकेबाजी करत अजित पवार यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली होती. अजित पवार यांच्यावर टीका करताना गणपती संदर्भात आक्षेपार्ह विधान त्यांनी केलं होतं. यावरून नितेश राणे आक्रमक झालेत.
उत्तम जानकर यांनी हिंदू देवांचा अपमान केला असल्याचं वक्तव्य भाजप नेते, आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. इतकंच नाहीतर तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर आहे का? असा सवाल करत शरद पवार यांच्यावर नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. उत्तम जानकर यांच्याकडून अजित पवार यांच्यावर टीका करताना गणपती संदर्भात आक्षेपार्ह विधान करण्यात आलं आहे. यावरूनच नितेश राणे यांनी सडकून टीका केली आहे. ‘साहेबांनी बारामतीमध्ये दीड दिवसांचा गणपती बसवला आणि या गणपतीची लोकप्रियता इतकी वाढली होती की, हा गणपती दूध प्यायचा म्हणून महाराष्ट्रभर बोलबाला झाला होता. एकदिवस बातमी आली. हा गणपती दारू प्यायला. भ्रष्ट झाला. त्यामुळे साहेबांनी दीड दिवसातच या गणपतीचं विसर्जन केलं.’, असं वक्तव्य उत्तम जानकर यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात पक्षप्रवेशावेळी केलं होते. या वक्तव्यावरूनच नितेश राणे यांनी पलटवार केला आहे.