‘तेव्हा राणे आणि राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमक्या उद्धव ठाकरेंनी दिलेल्या’, नितेश राणेंनी नेमकं काय म्हटलं?
सध्या धर्मवीर २ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून दिघेंना मारण्यातच आलं असं संजय शिरसाट यांनी म्हटल्यानंतर दोन्ही शिवसेनेत शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. अशातच नितेश राणे यांनी धर्मवीर २ या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
धर्मवीर -2 चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. मी अद्याप पाहिला नाही पण मी लवकरच पाहायला जाणार आहे. मात्र जे काय सत्य आहे ते धर्मवीर -2 या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रातील जनतेसमोर आले आहे. शिवसेनेत असताना वर्षानुवर्षे ज्यापद्धतीने घाणेरडं राजकारण उद्धव ठाकरे आणि त्यांची टोळी करत होती, त्याचे वस्त्रहरण धर्मवीर 2 मध्ये झाल्याचे पाहायला मिळाले असल्याचे नितेश राणे म्हणाले. दरम्यान, आनंद दिघे यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला नसून त्यांना मारण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. यावरून आनंद दिघे यांच्या मृत्यूवरून शिंदेंच्या शिवसेनेकडून सवाल उपस्थित करण्यात येत आहे. यावर बोलताना नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘आनंद दिघेंच्या मृत्यूवरून संशय वर्षानुवर्षे आहे. पण नारायण राणेंनी ज्यावेळी शिवसेना सोडली तेव्हा याच उद्धव ठाकरेंनी जीवे मारण्याची सुपारी दिली होती. राज ठाकरे यांना देखील असंख्य वेळा जीवे मारण्याचा धोका याच उद्धव ठाकरेंनी निर्मा केला होता. तर एकनाथ शिंदे मविआमध्ये असताना मंत्री होते तेव्हा त्यांची सुरक्षा कमी करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजेच आनंद दिघे मोठं होणं हे कोणाला आवडत नव्हतं?’, असा सवाल करत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.