भाजप आमदाराच्या पत्नीनं हाती बांधलं ‘घड्याळ’, पक्षप्रवेश करताच मिळाली लोकसभेची उमेदवारी
लोकसभा निवडणुका तोंडावर असताना भाजप आमदाराच्या पत्नीनं हाती 'घड्याळ' बांधल्याने चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत अर्चना पाटील यांचा आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी प्रवेश केला. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना भाजप आमदाराच्या पत्नीनं हाती ‘घड्याळ’ बांधल्याने चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत अर्चना पाटील यांचा आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे अर्चना पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून लोकसभेचं तिकीट जाहीर करण्यात आलं. त्यामुळे धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात अर्चना पाटील लढणार आहे. यावेळी ‘महायुतीच्या जागावाटपात धाराशिवची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आलेली आहे. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून अर्चना पाटील या आमच्या लोकसभेच्या उमेदवार आहेत. महायुतीच्या उमेदवाराची एकसंघाने घोषणा ही पहिल्यांदाच होत आहे.’, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.