‘लाडक्या बहिणीं’ना दमदाटी केल्यानंतर भाजप खासदाराची आता बिनशर्त माफी; म्हणाले, ‘माता-भगिनी…’
आपले १५०० रूपये घेऊन काँग्रेसच्या रॅलीत जाणाऱ्या महिलांचे फोटो काढा, त्या महिलांचे फोटो आम्हाला द्या आम्ही त्यांची व्यवस्था करतो, असं धनंजय महाडिक म्हणाले. कोल्हापूरमधील एका सभेत बोलताना धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेवरून एक विधान केलं. त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा झाल्यानंतर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेवरून आणि महिलांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर चर्चा सुरु झाली. आधी लाडक्या बहिणींना दमदाटी केल्याचा व्हिडीओ शरद पवार गटाकडून व्हायरल करण्यात आला. त्यानंतर धनंजय महाडिक यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना आता बोलण्यासारखं काहीच मुद्दे राहिलेलं नाहीत. म्हणून ते गैरसमज पसरवत आहेत, असं धनंजय महाडिक म्हणाले आहेत. तर ‘माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर मी त्यांची बिनशर्त माफी मागतो. माझे वक्तव्य कुठल्याही माता भगिनींचा अपमान कऱण्यासाठी मुळीच नव्हते. निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकारमुळेच यशस्वी झाली असल्याचे ठामपणे नमूद करताना विशेषतः वोट जिहाद करणाऱया महिलांच्या प्रती आलेली स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. मी वैयक्तिक, राजकीय आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान करत आलेलो आहे.’, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.