मुंबईः आदिपुरुष (Aadipurush) फिल्मच्या टिझरवर ट्रोलर्सनी तुफ्फान झोडून काढलंय. आता भाजपनेही (BJP) याच थेट आणि ठोक भूमिका घेतली आहे. हिंदु देवी देवतांचं विडंबन असलेला हा चित्रपट आमच्या महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असं वक्तव्य भाजपने केलंय. भाजप नेते राम कदम (Ram Kadam) यांनी आज याविषयी सविस्तर भाष्य केलं. आमच्या देवता आणि श्रद्धास्थानाचं विडंबन करून कोट्यवधी रुपये कमवायचे आणि नंतर माफी मागायची, ही नाटकं आता चालणार नाहीत, असं वकत्य राम कदम यांनी केलंय.
आदिपुरुष हा चित्रपट ओम राऊत दिग्दर्शित आहे. रामायणातील कथांवर हा चित्रपट आहे. यात प्रभासने रामाची तर सैफ अली खानने रावणाची भूमिका केली आहे. तर क्रीती सनॉनने सीतेची आणि सनी सिंह याने लक्ष्मणाची भूमिका केली आहे.
रावणाच्या भूमिकेतील सैफ अली खानाच्या लूकवर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच हनुमानाचं चित्रणही चुकीचं केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केलाय. 12 जानेवारी 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
राम कदम म्हणाले, ‘ आमच्या हिंदु देवी-देवतांचं विडंबन असणारी आदि पुरुष फिल्म आमच्या महाराष्ट्राच्या भूमीत प्रदर्शित होऊ देणार नाही.
काही फिल्म निर्मात्यांची ही सवय झाली आहे. हिंदु देवी देवतांचं फिल्ममधून विडंबन करायचं. फुटकची पब्लिसिटी मिळवायची आणि कोट्यवधी रुपयाचा धंदा करायचा…
कोट्यवधी रुपये कमवायचे म्हणून आमची श्रद्धा, आस्था, देवी-देवतांचं तुम्ही विडंबन कराल.. अन् मग निर्लज्जासारखे येऊन माफी मागतील. आता माफीनामा नाही…
सीन कट करण्याची नाटकंही नाहीत. हे सगळं ठरवून होतंय. म्हणून अशा प्रकारची फिल्म कायमची बॅन केली पाहिजे. हे करण्यामागे जे षड्यंत्री लोक आहेत, त्यांनाही फिल्म इंडस्ट्रीत काम करता येणार नाही, अशा प्रकारची बंधनं घालण्याची आता वेळ आली आहे. हिंदु देवी-देवतांचं विडंबन आम्ही कदापिही सहन करणार नाही, असं वक्तव्य राम कदम यांनी केलंय.