नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासन अॅक्शनमोडवर
मुंबईतील महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात विद्यार्थींनीचा लैंगिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, यानतंर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर त्या डीनची बदली झाली आहे.
मुंबईतील महानगरपालिकेच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रूग्णालयात विद्यार्थींनीचा लैंगिक छळ झाल्याचा प्रकार मनसेने समोर आणला आहे. नायर हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थीनीने एका सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरच्या विरोधात लैंगिक छळ झाल्याची तक्रार केली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर पावले उचलली आहे. रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर नायर रूग्णालयाच्या डीनची बदली करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेकडून सहाय्यक प्राध्यापकावर फक्त निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर फक्त निलंबन किंवा बदली न करता आरोपींवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. संदीप देशपांडे यांनी म्हटले की, सोमवारी नायर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना भेटलो. त्या ठिकाणी घडलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणानंतर सगळे जण प्रचंड दहशतीखाली आहेत. नायरची वाटचाल कोलकात्ताच्या दिशेने होत आहे. महापालिका प्रशासनाने हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळले पाहिजे.