गुरांना चारा, कुत्र्यांना पोळ्या अन् मुंग्यांना साखरेचा बेत; शेतकऱ्याच्या मुलीचा कुठं झाला अनोखा लग्नसोहळा?
VIDEO | शेतकऱ्याच्या एकुलत्या एक मुलीचं शाही लग्न अन् जिल्हाभर चर्चा, काय होतं असं वेगळं की वऱ्हाड्यांसाठीही विवाह सोहळा ठरला अविस्मरणीय
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील कोथळी या छोट्याशा गावातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या मुलीचा केलेल्या शाही विवाहाची जिल्हाभर जोरदार चर्चा सुरु आहे. ज्यामध्ये परिसरातील पाच गावातील सर्व जातीधर्माच्या दहा हजार नागरिकांसह प्राणी आणि पक्षांनाही पंगत देण्यात आली आहे. मोताळा तालुक्यातील कोथळी गावातील प्रकाश सरोदे या शेतकऱ्याच्या एकुलत्या एक मुलीचा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला, आता तुम्ही म्हणाल यात नवल काय, तर या विवाह सोहळ्यासाठी गावालगत पाच एकर शेतात मंडप टाकण्यात आला होता. परिसरातील पाच गावातील सर्वांना या विवहाचे निमंत्रण देण्यात आले होते. जवळपास दहा हजार लोकांना जेवणही देण्यात आले, इतकच काय तर सरोदे यांनी परिसरातील गुरे, पशू पक्ष्याना ही पंगत दिली आहे, यासाठी गायींना दहा क्विंटल ढेप, गुरांना दहा ट्रॉली सुखा चारा, परिसरातील श्वानांना जेवण इतकंच काय तर परिसरातील मुंग्या ही उपाशी राहू नये म्हणून मुंग्यांना दोन पोते साखर टाकण्यात आली. प्रकाश सरोदे यांनी आपल्या लाडक्या कन्येचा विवाह भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या अतुल दिवाणे याच्याशी केला, अल्पभूधारक असूनही नातेवाईकांच्या मदतीने हा लग्न सोहळा परिसरातील सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला आहे.