विशेष अधिवेशनातून आरक्षण मिळेल का ? काय सांगतो नियम? काय म्हणतात घटनातज्ञ?
मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलीय. त्यासंदर्भात सरकारच्या हालचालीही सुरु आहेत. मात्र विशेष अधिवेशनातून मराठा आरक्षणाचा मार्ग निघेल का? हा खरा प्रश्न आहे.
मुंबई | 31 ऑक्टोंबर 2023 : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावर सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी केलीय. तर, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मागणीला पाठींबा दिलाय. विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणावर मार्ग काढा असे ठाकरे म्हणाले आहेत. तर, राज्य सरकारनेही विशेष अधिवेशन घेण्यासाठी हालचाली हलचाली सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी रात्री राज्यपाल बैस यांची भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यामुळे सरकार विशेष अधिवेशन घेणार अशी शक्यता निर्माण झालीय. पण, प्रश्न हा आहे की, विशेष अधिवेशन बोलावलंच तर काय होणार? विशेष अधिवेशनात सर्वपक्षीय आमदार मराठा आरक्षणाला समर्थन देऊ शकतात. मराठा समाजाला कशाप्रकारे आरक्षण देता येईल यावर चर्चा होईल. पण महाराष्ट्रात 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली असून 52 % आरक्षण आहे. त्यामुळं केंद्र सरकारला 50टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याची मागणी होऊ शकते. त्यासाठी विशेष अधिवेशनात ठराव एकमतानं पारीत करुन केंद्र सरकारला पाठवला जाऊ शकतो. मात्र, यावरून घटनातज्ज्ञांमध्ये मतंमतांतर आहेत.