‘सेलिब्रिटी क्रिकेट लीग’ यंदाही वेगळ्या फॉरमॅटमध्ये! कोणत्या दिग्गज कलाकारांचा असणार सहभाग?
'सेलिब्रिटी क्रिकेट लीग'मध्ये दिग्गज कलाकारांचा असणार सहभाग, मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये रंगला दिमाखदार उद्घाटन सोहळा
मुंबई : देशातील कलाकारांचा सहभाग असलेली सेलिब्रिटी क्रिकेट लीग स्पर्धा यंदाही मोठ्या जोशात पार पडणार आहे. मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये शनिवारी या स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा रंगला, यावेळी बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
यंदा या स्पर्धेत मुंबई हिरोज, केरला स्ट्रायकर्स, चेन्नई ऱ्हायनोज, तेलगू वॉरिअर्स, कर्नाटक बुलडोझर्स, बंगाल टायगर्स, पंजाब दे शेर, भोजपुरी दबंग अशा कलाकारांच्या ८ टिम्स सहभागी होणार आहेत. सोहेल खानच्या मालकीची असलेल्या मुंबई टीमचा सलमान खान हा ब्रँड अँबेसिडर असणार आहे. मोहन लाल हे केरळच्या टीमचे सहमालक असून बोनी कपूर हे बंगाल टीमचे मालक आहेत. अभिनेता व्यंकटेश हा तेलगू टीमचा सहमालक आहे. अभिनेता जिशु सेनगुप्ता बंगालचा कर्णधार असून रितेश देशमुख मुंबईचा कर्णधार आहे. तर सोनू सूद हा पंजाबचा, कीचा सुदीप कर्नाटकचा, मनोज तिवारी भोजपुरी दबंगचा, अखिल अक्कीनेनी तेलगू टीमचा, कुंचको बोबन केरळ टीमचा, तर विष्णू विशाल हा चेन्नईचा कर्णधार आहे.
विष्णू वर्धन इंदूरी हे सेलिब्रेटी क्रिकेट लीगचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक असून यंदा प्रत्येक संघाला १०-१० ओव्हर्सच्या २ इनिंग खेळायला मिळतील, असे त्यांनी सांगितले. १८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत १९ मॅच होतील, अशी माहिती त्यांनी दिली.