Central Railway : डोंबिवली स्थानकाजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा, नेमकं काय झालं?
डोंबिवली दरम्यान एक्स्प्रेस गाड्यांच्या एकामागे एक अशा रांगा लागल्याचे पाहायला मिळतंय. मात्र रेल्वे प्रशासनाकडून नेमका काय तांत्रिक बिघाड झाला याची अधिकृतपणे कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. परिणामी मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरासह कल्याण, डोंबिवली, ठाणे या भागात मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे. त्यामुळे ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशीच परिस्थिती सध्या मध्य रेल्वेची झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, यामुले कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, कर्जत, ठाणे या ठिकाणी राहणाऱ्या रेल्वे प्रवाशांना रोजचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशातच आज दुपारी पावणे चार वाजेच्या आसपास डोंबिवलीजवळ मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले. त्यामुळे डोंबिवली दरम्यान एक्स्प्रेस गाड्यांच्या एकामागे एक अशा रांगा लागल्याचे पाहायला मिळतंय. मात्र रेल्वे प्रशासनाकडून नेमका काय तांत्रिक बिघाड झाला याची अधिकृतपणे कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. परिणामी एक्स्प्रेस गाड्यांच्या रांगा लागल्याने मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत.