Chandrakant Khaire : खुलताबादचं ‘रत्नपूर’ करा ही आमचीच मागणी, बाळासाहेबांचा उल्लेख करत खैरेंनी सांगितला नावाचा इतिहास
खुलताबादचे रत्नपूर हे नाव झालेच पाहिजे. आम्ही ही मागणी खूप दिवसांपूर्वी केलेली आहे, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय. यावेळी त्यांना नावाचा इतिहासही सांगितला.
भारतीय जनता पक्षाने रस्त्यांसह शहरांची नावे बदलली आहेत. सर्व नावे बदलून झाली असून आता त्यांना त्यांच्या बापाचे नाव बदलण्याची वेळ आली आहे, असं एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी म्हणत टीकास्त्र डागलं होतं. यावर भाष्य करताना चंद्रकांत खैरे म्हणाले, माझ्या बापाचं नाव भाऊसाहेब खैरे आहे, ते आहेच. हे नाव आम्ही कधीही बदलत नाही. इम्तियाज जलील काहीही म्हणतात. त्यांच्या म्हणण्याला आम्ही महत्त्व देत नाही, असं म्हणत खैरेंनी जलील यांना फटकारत पलटवार केलाय. यावेळी त्यांनी असेही सांगितले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 8 मे 1988 रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळात या शहराचे नाव संभाजीनगर ठेवले होते. त्यावेळी आम्ही रत्नपूरची आठवण करून दिली होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे खुलताबादचं रत्नपूर करायचं असं म्हणाले होते. खुलताबाद हे नाव कशाला पाहिजे. खुलताबादचे नाव रत्नपूर झाले पाहिजे. तेव्हापासूनच आम्ही खुलताबादला रत्नपूर असे म्हणतो, असे चंद्रकांत खैरे म्हणाले. रामराज्य असताना खुलताबादचे नाव भद्रावती नगर होते. महाभारतावेळी या शहराचे नाव रत्नपूर ठेवण्यात आले. मात्र औरंगजेबाच्या कटकारस्थानामुळे खुलताबाद हे नाव ठेवण्यात आलं पण रत्नपूर हे नाव पौराणिक आहे. हेच नाव झालं पाहिजे, अशी मागणीही चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा केली.