सरकार पडणार, असं सांगणारे ज्योतिषी थकले; मुख्यमंत्री शिंदे यांचा कुणाला खोचक टोला?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे. सरकार कोसळणार असं वारंवार म्हणत राहिले पण सरकार अधिक मजबूत होत गेलं तर विरोधकांकडून तारीख पे तारीख सुरू आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला
ठाणे, २७ नोव्हेंबर २०२३ : सरकार पडणार, असं सांगणारे ज्योतिषी थकले असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे. सरकार कोसळणार असं वारंवार म्हणत राहिले पण सरकार अधिक मजबूत होत गेलं तर विरोधकांकडून तारीख पे तारीख सुरू आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तर आता ३१ डिसेंबर ही तारीख देत सरकार पडणार असल्याचा दावा केला जातोय. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते ठाण्यात धर्मवीर २ चित्रपटाच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते. लोकांचा सर्वदूर विकास झाला पाहिजे. सरकार स्थापन झाल्यापासून सगळे लोक सरकार पडणार, सरकार जाणार म्हणून ओरडत होते. आता हे ज्योतिष थकले, कारण आनंद दिघे साहेब माझ्या पाठिशी उभे आहेत. आता म्हणायला लागले की मुख्यमंत्री बदलणार. पण सरकार मजबूत होत गेलं, असं म्हणत शिंदेंनी विरोधकांना टोला लगावला आहे.