वांझोट्या भेटीच्या वक्तव्यावरून संजय गायकवाड यांचे दानवे यांना जशास तसे प्रत्युत्तर
जेवढी मदत शिंदे सरकारने केली तेवढी उभ्या आयुष्यात कुण्या सरकारने केलेली पाहिलीय का? असा सवाल त्यांनी दानवे यांना विचारला. अगोदरचे सरकार पर्जन्यमापकावर मदत करत होते, मात्र आताच्या सरकारने सततच्या पावसामुळे आपत्कालीन मदत जाहीर करण्याचा नियम केला
बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्याच्या नुसत्या वांझोट्या भेटी म्हणत टीका केली होती. तर मुख्यमंत्र्यांनी वांझोट्या भेटी करण्याच्या ऐवजी मदतीची घोषणा करावी असे म्हटले होते. त्यावरून बुलढाण्याचे शिवसेना नेते आमदार संजय गायकवाड यांनी दानवे यांना जशास तसे प्रत्युत्तर दिलंय. जेवढी मदत शिंदे सरकारने केली तेवढी उभ्या आयुष्यात कुण्या सरकारने केलेली पाहिलीय का? असा सवाल त्यांनी दानवे यांना विचारला. अगोदरचे सरकार पर्जन्यमापकावर मदत करत होते, मात्र आताच्या सरकारने सततच्या पावसामुळे आपत्कालीन मदत जाहीर करण्याचा नियम केला. त्यामुळे केवळ विरोधाला विरोध करू नका, असं संजय गायकवाड यांनी दानवे यांना सुनावलंय.