Special Report | संजय राठोडांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांचा संताप
राठोडांवर ज्यावेळी आरोप झाले त्यावेळी ते उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीसोबत सत्तेत होते आणि विरोधात भाजप होती. आता परिस्थिती बदललीय. राठोड ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात आलेत आणि सत्ता भाजप-शिंदे गटाची आहे. आता भाजपसोबतच्या युती सरकारच्या मंत्रिमंडळात राठोड आहेत. त्यामुळं भाजप आणि चित्रा वाघ यांना महाविकास आघाडीकडून डिवचणं सुरु झालंय.
मुंबई : शिंदे गटाकडून, संजय राठोडांनी(sanjay rathod) कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आणि इकडे भाजपच्या चित्रा वाघ(Chitra Wagh) चांगल्याच संतापल्या. राठोडांनी मंत्रिपदाची शपथ घेताच काही मिनिटातच, चित्रा वाघ यांनी ट्विट करुन, राठोडांविरोधातली लढाई सुरुच ठेवण्याचा एल्गार केला तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत असणारे संजय राठोडांना पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं अत्यंत दुर्दैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेले असले तरी त्यांच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरुच ठेवलेला आहे. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. लढेंगे, जितेंगे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड वनमंत्री होते. बीडच्या तरुणीनं पुण्यात आत्महत्या केली, त्यावरुन राठोडांवर आरोप झाले.
संजय राठोडांच्या कथित ऑडिओ क्लीपही व्हायरल झाल्या. चित्रा वाघ यांनीही राठोडांच्या विरोधात आवाज उठवला होता. अखेर राठोडांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
राठोडांवर ज्यावेळी आरोप झाले त्यावेळी ते उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीसोबत सत्तेत होते आणि विरोधात भाजप होती. आता परिस्थिती बदललीय. राठोड ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात आलेत आणि सत्ता भाजप-शिंदे गटाची आहे. आता भाजपसोबतच्या युती सरकारच्या मंत्रिमंडळात राठोड आहेत. त्यामुळं भाजप आणि चित्रा वाघ यांना महाविकास आघाडीकडून डिवचणं सुरु झालंय.
तर स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय राठोडांची बाजू घेतलीय. पोलिसांनीच राठोडांना क्लीन चिट दिलीय, असं शिंदे म्हणालेत. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. ज्यांच्या दबावात आणि आरोपांमुळं राठोडांना मंत्रीपदावरुन गेल्या वर्षी पायउतार व्हावं लागलं होतं. आता त्यांच्याच सोबत राठोड मंत्रिमंडळात काम करणार आहे.