एकनाथ शिंदे असं काय बोलले की एका वाक्यानं थेट ‘आपत्ती व्यवस्थापन समिती’त एन्ट्री
आपत्ती व्यवस्थापन समितीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना घेतलं मात्र शिंदेंचा समावेश नव्हता. त्यावरून एकनाथ शिंदे असे काही बोले की त्यानंतर लगेच कॅबिनेटच्या बैठकीत शिंदेंचा समावेश करण्यावरून निर्णय झाला आहे.
जिथे आपत्ती, पूर, संकट येतं तिथे एकनाथ शिंदे असतो अशी रोखठोक प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली. आणि एका तासात कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये एकनाथ शिंदेंचा समावेश करण्याचा निर्णय झाला. ६ फेब्रुवारीला आपत्ती व्यवस्थापन समिती संदर्भात एक परिपत्रक निघालं ज्यात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा समावेश होता पण एकनाथ शिंदे यांचा समावेश नसल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर उमटला आणि विरोधकांनाही टिकेची संधी मिळाली. विशेष म्हणजे आपत्ती व्यवस्थापन समिती कधी स्थापन झाली आपल्याला काही माहिती नाही असं सांगून शिंदे यांच्या बोलण्यातून सुद्धा नाराजीच उमटली. पण तात्काळ कॅबिनेटमध्ये शिंदेंचा अर्थात दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचाही समावेश करण्याचा प्रस्ताव पास झाला. आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा समितीमध्ये समावेश झाला आहे. भूकंप, महापूर किंवा इतर संकट ओढावल्यावर तात्काळ मदत पोहोचावी म्हणून सरकारची आपत्ती व्यवस्थापन समिती असते पण मुख्यमंत्री पदसिद्ध अध्यक्ष असतातच पण त्याच वेळेला अजित पवारांना घेतलं आणि शिंदेंना वगळल्याने चर्चा नाराजी समोर येणारच होती. अखेर निर्णय सुधारण्याची वेळ सरकारवर आली आणि शिंदेंना स्थान मिळाल्याचे पाहायला मिळाले.