अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात दादांची गैरहजेरी अन् चर्चांना उधाण, अजित पवार का, कुठेच दिसले नाहीत?
केंद्रीय मंत्री अमित शाह दोन दिवसीय मुंबई दौरा अटपून दिल्लीला गेलेत. मात्र या अमित शहा यांच्या दौऱ्यावरून चर्चा रंगली ती अजित पवार यांची... कारण अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र दिसले नाहीत.
दोन दिवसांच्या अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. पण दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गैरहजर दिसले. त्यामुळे स्वाभाविक अजित पवार अमित शाहांच्या दौऱ्यात का दिसले नाहीत? अजित पवार यांना नेमकं काय झालंय? अशी खलबतं सुरू झालीत. रविवारी अमित शाह हे मुंबई विमानतळावर दाखल झाले त्यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं पण इथे अजित पवार आले नाहीत. त्यानंतर अमित शाह हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी गेले तेव्हा देवेंद्र फडणवीस होते पण अजित पवार नव्हते. वर्षा निवासस्थानानंतर अमित शाह हे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गेलेत आणि त्यांच्या बाप्पांचं दर्शन घेतलं. त्यावेळी एकनाथ शिंदे होते पण अजित पवार नव्हते. यानंतर अमित शाह यांनी लालबागच्या राजाच्या दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हजर होते पण अजित पवार नव्हते . त्यामुळे अमित शाहांसोबत सगळ्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. पण दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार का नव्हते? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.