विचार, विकास आणि विश्वास… महायुती सरकारला २ वर्ष पूर्ण, FB पोस्ट करत शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं; नेमकं काय म्हणाले?
मंगल आणि पवित्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दोन वर्षांपूर्वी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. जनतेची साथ, विश्वास हेच माझे संचित आहे. तुमच्या प्रेमाच्या, आशीर्वादाच्या बळावर आणि सहकाऱ्यांच्या विश्वासावरच मी राज्याचे नेतृत्व करत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारला आज दोन वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी फेसबुक पोस्ट केली. मंगल आणि पवित्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दोन वर्षांपूर्वी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. जनतेची साथ, विश्वास हेच माझे संचित आहे. तुमच्या प्रेमाच्या, आशीर्वादाच्या बळावर आणि सहकाऱ्यांच्या विश्वासावरच मी राज्याचे नेतृत्व करत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर शिंदेंनी ही फेसबुक पोस्ट करत उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी वैचारिक दगाबाजी करीत, ज्यांनी असंगाशी संग केला होता, त्यांची साथ सोडून आम्ही जनतेच्या मनातले सरकार स्थापन केले, त्याला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. शिवसेनाप्रमुखांचा विचार जपण्यासाठी स्थापन झालेल्या या सरकारने देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कणखर केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दोन वर्षे महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेऊन अहोरात्र काम केले. त्यातूनच जनतेचा विश्वास आम्ही कमावला, याचे आज समाधान आणि आनंद आहे.’, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.