तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना थेट आवाहन

तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना थेट आवाहन

| Updated on: Oct 12, 2024 | 1:58 PM

पॉडकास्टवरून संवाद साधताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारणावर आणि राजकारण्यांवर टीका केली. यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. 'राज ठाकरे यांनी आमच्यासोबत यावं आणि एकट्या व्यक्तीने क्रांती घडत नसते, तुम्ही आमच्यासोबत ते आपण सर्व मिळून क्रांती घडवू', असे संजय शिरसाट म्हणाले. 

विजया दशमीनिमित्त पहिल्यांदाच पॉडकास्टवरून राज ठाकरे यांनी संवाद साधला आहे. यामाध्यमातून राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारणावर आणि राजकारण्यांवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले.  ‘महाराष्ट्राचं सोनं लुटलं जातंय आणि तुम्ही जाती-पातीत मश्गूल आहात. येणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी क्रांती केली पाहिजे’, असं म्हणत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करत राजकीय नेत्यांवरही हल्लाबोल केला. राज ठाकरे पॉडकास्टच्या राज्यातील राजकारणावर आणि राजकारण्यांवर हल्लाबोल केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते प्रवक्ते संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘क्रांती करायला हवी आणि आम्ही एक क्रांती केली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही पुढे आलो. आता राज ठाकरे यांनी सुद्धा आमच्या क्रांतीला पाठिंबा द्यावा’, असे आवाहन राज ठाकरेंना संजय शिरसाट यांनी केलं. पुढे ते असेही म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील सोनं खरंच टिकवायचं असेल आपली वज्रमूठ एक असावी, प्रत्येकाने आपापली मूठ आवळली तर क्रांती घडू शकत नाही पण आपण सगळ्यांची वज्रमूठ एक असेल तर क्रांती घडू शकते. म्हणून राज ठाकरेंनी सोबत यावं निश्चित क्रांती घडले’, असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.

 

Published on: Oct 12, 2024 01:49 PM