‘तर पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का?’ एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
आरोपीने गोळीबार केल्यावर पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का? असा सवाल करत आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. जर आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला नसता तर तो पळून गेला कसा? पोलिसांनी बंदूक काय शोसाठी ठेवली काय? असंही विरोधक बोलले असते असे एकनाथ शिंदे म्हणाले. ‘बदलापूरमध्ये घटना घडल्यानंतर म्हणत होते आरोपीला फाशीचीच शिक्षा द्या. आमच्या समोर आणा…असं म्हणत होते. आता आरोपी जेव्हा गोळीबार करू लागतो, तेव्हा पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का?’, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलंय. पुढे एकनाथ शिंदे असेही म्हणाले की, ‘जर आरोपीचं एन्काऊंटर केला नसता तर म्हणाले असते चार लोकं असून आरोपी गोळीबार करून पळून गेला… पिस्तूल काय शो साठी ठेवलंय काय?’ असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोप आणि टीकेवर बोलताना त्यांना फटकारलं आहे.