'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी धक्का देणारी...', काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचा गौप्यस्फोट

‘भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी धक्का देणारी…’, काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचा गौप्यस्फोट

| Updated on: Oct 22, 2024 | 1:19 PM

विधानसभा निवडणुकीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्यानंतर आता राजकीय पक्षांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. रविवारी भाजपकडून ९९ उमेदवारांची यादी जाहीर झाली तर काँग्रेसच्या ६२ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होऊ शकते, अशी माहिती समोर येतेय

काँग्रेसच्या ६२ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होऊ शकते, असं काँग्रेसचे नेते माजी मंत्री नितीन राऊत यांनी म्हटले तर काल झालेल्या काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये ९६ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यातील ६२ उमेदवारांची नावं असणारी काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे. तर आमची यादी धक्का देणारी असू शकते, असंही त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि सर्व्हेत ज्यांची नावं आघाडीवर, त्यांची आज उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हते पण आमची यादी धक्का देणारी असू शकते, असे म्हणत नितीन राऊत यांनी एकप्रकारे इशाराच दिला आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांसह वरिष्ठ नेत्यांची उमेदवारी जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत काल बहुतांश उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आल्याचे नितीन राऊत यांनी म्हटले.

Published on: Oct 22, 2024 01:19 PM