मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले रवी राजा बीएमसीचे विरोधी पक्षनेते होते. रवी राजा सायन कोळीवाडामधून ५ टर्म नगरसेवक राहिले आहेत. यादरम्यान, १९८० मध्ये रवी राजा हे युवक काँग्रेसशी जोडले गेले, ४४ वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय होते. आता त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत भाजपने मोठी खेळी केल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेस नेते, माजी नगरसेवक रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस नेते रवी राजा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केलाय. मुंबईतील सायन कोळीवाडा या ठिकाणाहून रवी राजा हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. पण काँग्रेसने या मतदारसंघातून गणेश यादव यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे ते नाराज झाले आणि त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना आपला राजीनामा दिला आणि त्यांनी भाजपात प्रवेश केला. दिल्लीच्या वशिल्यावर उमेदवारी दिली जाते, काँग्रेस सोडताना रवी राजा यांनी पक्षावर आरोप केला. काँग्रेसने कामाची पोचपावती दिली नाही, रवी राजा यांच्याकडून खंत व्यक्त करण्यात आली.