संभाव्य पराभव टाळण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे – Vijay Wadettiwar

| Updated on: Nov 19, 2021 | 2:32 PM

निवडणुकी आधी महागाई कमी करायची, काही निर्णय घ्यायचे आणि सत्तेत आल्यावर पुन्हा तेच निर्णय राबवायचे ही मोदी सरकारची खेळी राहिली आहे, त्यामुळे आमचा भाजपवर विश्वास नाही, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो. पण ही केवळ उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकीपुरती नौटंकी तर नाही ना? असा सवाल करतानाच आपल्यामुळेच 600 शेतकऱ्यांचा या आंदोलनात जीव गेल्याचं मान्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी, अशी मागणी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. पंतप्रधानांनी वादग्रस्त कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्याचं आम्ही स्वागत करतो. पण उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका पाहून तर ही खेळी केली नाही ना? आज कायदे मागे घेतले उद्या सत्तेत आल्यावर पुन्हा हे कायदे आणले तर जाणार नाही ना? केवळ निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठीचा हा फंडा तर नाही ना? असे सवाल करतानाच निवडणुकी आधी महागाई कमी करायची, काही निर्णय घ्यायचे आणि सत्तेत आल्यावर पुन्हा तेच निर्णय राबवायचे ही मोदी सरकारची खेळी राहिली आहे, त्यामुळे आमचा भाजपवर विश्वास नाही, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.