मंत्रिमंडळ विस्तार झालं तर सरकार कोलमडणार, ‘या’ काँग्रेस नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
राज्यातील शिंदे गट आणि भाजपचे अनेक आमदार मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून बसले आहेत, पण सरकार कोणा-कोणाला दिलेले आश्वासन पूर्ण करणार? वडेट्टीवार यांचा सवाल
अहमदनगर : शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे साऱ्याचे लक्ष लागलेले असताना मंत्रिमंडळ विस्तार होऊत शकत नाही आणि मंत्रिमंडळ विस्तार झालं तर सरकार कोलमडणार, असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसच्या बड्या नेत्याने केले आहे. राज्यातील शिंदे यांची शिवसेना आणि भाजपचे अनेक आमदार मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून बसले आहेत. दरम्यान, सगळ्यांनाच आश्वासन देण्यात आले आहे. मंत्रिमंडळाला मर्यादा आहेत. त्यामुळे आश्वासनाची पूर्ती कशी करणार असा सवाल उपस्थित करत हे सरकार अस्थिर असल्याची टीकाही विजय वड्डेटीवार यांनी केली आहे.
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात नाराज झालेल्या अनेक आमदारांची धुसफूस वारंवार समोर आली आहे. आता दुसऱ्या विस्तारात आमदारांची नाराजी सरकारला झेपणार नाही, सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकते, असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले आहे.