Special Report | बड्या नेत्यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव – Tv9
राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील 50 आमदार आणि 10 ते 15 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबई: शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. राऊत यांची आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीला कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरातील सदस्यांना कोरोनाची लक्षणे जाणवल्यानंतर त्यांची टेस्ट करण्यात आली होती. या टेस्टचा रिपोर्ट आला असून राऊत यांच्या आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. मात्र, या सर्वांची लक्षणे सौम्य असून त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील 50 आमदार आणि 10 ते 15 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, खासदार सुजय विखे पाटील, शिवसेना नेते अरविंद सावंत, मदन येरावार, वरुण सरदेसाई, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी आदींना कोरोनाची लागण झाली आहे. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. या शिवाय गायक सोनू निगमलाही कोरोनाची लागण झाली आहे. तर सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बंगल्यातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.