अद्वय हिरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशावर दादा भुसे म्हणाले….
अद्वय हिरे यांच्या ठाकरे गटातील पक्षप्रवेशावर शिंदे गटाच्या दादा भुसे यांची प्रतिक्रिया
भाजपला सोडचिठ्ठी देत अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. अद्वय हिरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. येणाऱ्या काळात मालेगावची विधानसभा ही आम्ही शिवसेनाला जिंकून दाखवू. जो विश्वास उद्धव ठाकरे यांनी दाखवला आहे, त्या पद्धतीने संपूर्ण उत्तर महाराष्ट्र फिरून जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील आणि पहिल्या क्रमांकाचा शिवसेना पक्ष कसा येईल, यासाठी प्रयत्नशील असेल, अशी भावना अद्वय हिरे यांनी व्यक्त केली. दरम्यान, अद्वय हिरे यांच्या ठाकरे गटातील पक्षप्रवेशावर शिंदे गटाच्या दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकशाही प्रक्रियेत, सभा घेणे, मतं माडणं, कोणाला कोणत्या पक्षात जायचे आहे हे ठरविण्याचा अधिकार आहे आणि त्यांना मी शुभेच्छा देतो. तर मालेगावमधील सभेसाठी मी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देतो, असे त्यांनी म्हटले आहे. एखादा शिवसैनिक जर काम करत असेल तर तो फक्त निवडणुकीपुरते मर्यादित काम करत नाही. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण अशी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसैनिकांना शिकवण आहे. त्या पार्श्वभूमीवर जे जे शक्य असेल ते मी करत असतो. निवडणुकीकरता कोणतेही काम करायचे नसते, असेही त्यांनी सांगितले.