अजितदादा भाषणादरम्यान कार्यकर्त्यांवर भडकले, 'फालतूपणा बस्स, आता तू बोलला ना तर मी...'

अजितदादा भाषणादरम्यान कार्यकर्त्यांवर भडकले, ‘फालतूपणा बस्स, आता तू बोलला ना तर मी…’

| Updated on: Oct 01, 2024 | 4:56 PM

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा सुरु आहे. आज ही यात्रा बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये आहे. या जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजलगावच्या नागरिकांना संबोधित केलं. अजित पवार यांचं भाषण सुरु होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली अन्....

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाषणादरम्यान एका कार्यकर्त्यावर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. घोषणा न थांबवल्यास निघून जाणार असा इशाराच अजित पवार यांनी भरसभेतून या कार्यकर्त्याला दिला. बीडच्या माजलगाव येथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा पार पडतेय. या जनसन्मान यात्रेदरम्यानच हा प्रकार घडला. माजलगाव येथील जनसन्मान यात्रेत ‘दादा तुम आगे बढो’च्या घोषणा कार्यकर्त्याकडून देणं सुरू होतं. मात्र त्याला काही स्टॉप नव्हता. अखेर लगातार घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अजित पवार संतापले. ‘आता तू बोलला ना मी भाषण बंद करून निघून जाईल. फालतूपणा बंद झाला पाहिजे. काही शिस्त आहे की नाही? की तुम्हालाच कळतंय आम्हाला काही कळत नाही.’, असे म्हणत अजित पवार घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यावर चांगलेच भडकले. पुढे ते असेही म्हणाले, तरूणपणात आम्हीही उत्साह दाखवला आहे पण काहीतरी त्याला शिस्त ठेवा, असा सल्लाही या अजित पवारांनी या घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Oct 01, 2024 04:56 PM