अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? नेमकं काय घडलं? दादांनी स्पष्टच म्हटलं….
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वाद झाल्याची माहिती समोर आली होती. यावर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया पाहायला मिळत असतात अजित पवार यांनी या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे.
महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच आता महायुतीत वादाला ठिणगी पडली असल्याची चर्चा सुरू आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वाद झाल्याची चर्चा सध्या होतेय. सूत्रांच्या माहितीनुसार, काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात काहीसा वाद झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या अलिबाग-विरार प्रकल्पाला मंजुरी देण्यास अजित पवारांनी परवानगी नाकारली आणि त्यामुळे या दोघांमधील वाद विकोपाला गेल्याचे म्हटले जात होते. मात्र या चर्चांवर स्वतः अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. टीव्ही ९ मराठीशी बोलताना अजित पवारांनी या चर्चांवर भाष्य करत मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघण्याचे कारण सांगितले. ‘काल लातूर जिल्ह्यात अहमपूर येथे माझा कार्यक्रम होता. १० वाजता कॅबिनेट होती. काही कारणाने उशिरा कॅबिनेट सुरू झाली. मला १ वाजता टेक ऑफ करायचं होतं. त्यामुळे कॅबिनेट ११.३० ते १ वाजेपर्यंत मी थांबलो. मला १ वाजता जाणं गरजेचं होतं. मी साडे १२ वाजता निघालो. कारण २ वाजता नांदेडला पोहोचून तेथून अहमदपूर येथे जायचं होतं.’, असे अजित पवार यांनी सांगितले.