‘लाडक्या बहिणीचा राग अनावर’, मंत्रालयातील कार्यालयाच्या तोडफोडीवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मंत्रालयातील कार्यालयात असणारी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची पाटी फेकून देत अज्ञात महिलेने एकच गोंधळ घातला. यानंतर ही अज्ञात महिला त्यानंतर तिथून पसार झाली. ही महिला कोण होती? या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून नासधूस करण्यात आली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची पाटी फेकून देत अज्ञात महिलेने पोबारा केला आहे. या अज्ञात कार्यालयात घुसून एकच गोंधळ घातला आणि तोडफोडीचा प्रयत्न केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ‘मी माहिती घेतली. ही कालची घटना आहे. त्या माहिलेने कार्यालयाचं नुकसान का केलं? तिचं म्हणणं नेमकं काय होतं? हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ. उद्विग्नतेच्या भावनेने त्या महिलेने कार्यालयाचं नुकसान केलं का? त्या महिलेची व्यथा काही आहे का? कोणी जाणीवपूर्वक पाठवलंय का, हे आम्ही निश्चितपणे समजून घेऊ, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर या घटनेनंतर लाडक्या बहिणीचा राग अनावर झाल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधक निराश आणि हाताश झाले आहेत. त्यांच्याकडे मुद्दे नाहीत. माझ्याकडे त्यांच्याविषयी बोलायला अनेक उदाहरणं आहेत पण ते खालच्या थरावर उतरले म्हणून माझ्यासारख्याने उतरायचं नसतं, असं म्हणत विरोधकांच्या टीकेवर जास्त बोलणं देवेंद्र फडणवीस यांनी टाळलं.