महाविकास आघाडीकडे दोनच योजना लाडकी मुलगा अन्…. देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका
मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचा लाडक्या बहिणीचा ‘देवा भाऊ’ कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्ह्यांमधील बहिणींसोबत संवाद साधला. इतकंच नाहीतर यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीसह विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
राज्यात लाडकी बहीण योजना चांगलीच गाजत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीमधील पक्षांकडे लाडकी मुलगी आणि लाडका मुलगा या दोन योजना आहेत, असं वक्तव्य करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांची मुलं सोडून बाकी काही पाहायचं नाही, असा खोचक टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. ‘महाविकास आघाडीतील पक्षांचं ब्रीद वाक्य लाडकी बहीण नाही तर लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी… असं आहे. म्हणजे मुख्यमंत्री झाला तर माझा मुलगा आणि पंतप्रधानमंत्री झाला तर माझी मुलगी आणि मुख्यमंत्री झाली तर माझी मुलगी… यांच्याकडे दोनच योजना चालतात एक म्हणजे लाडकी मुलगा आणि लाडकी मुलगी, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मविआवर निशाणा साधला आहे. पुढे देवेंद्र फडणवीस असेही म्हणाले की, महाविकास आघाडीतील नेत्यांना फक्त त्यांची मुलं एवढाच त्यांचा संसार आहे. याच्या पलिकडे त्यांना पाहायचं नाहीये…