‘रक्ताच्या नात्याने कुणाचा वारसा येत नाही तर…’, फडणवीसांकडून शिंदेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त
ठाणे शहरातील कोपरी- पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मिनाक्षी शिंदे तसेच वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे उपस्थित होते.
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे उमेदवारी अर्ज दाखल केला. ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आतापर्यंत चारवेळा ते या विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे हे निवडून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठं शक्ती प्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेच्या वतीने कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आज ठाण्यातील आनंदआश्रमात जाऊन हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा शिंदेंनी आशीर्वाद घेतला. त्यांच्या विचारांवर चालणारे सरकारची दोन वर्षे यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्यांच्या आशीर्वादाने या राज्यात महायुतीचे सरकार नक्की येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या जुन्या मतांचा विक्रम मोडून मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. रक्ताच्या नात्याने कुणाचा वारसा येत नाही तर वारसा विचाराने आणि कृतीने येतो असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर आनंद दिघे यांचा वारसा हा एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.