अजित पवारांवर फडणवीसांची तुफान फटकेबाजी; म्हणाले, ‘दादा फाईलवर असं काही लिहीतात की, परत त्यांच्याकडेच…’
‘योद्धा कर्मयोगी एकनाथ शिंदे’ या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळा या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली.
“अजित पवार यांनी बोलताना काही गोष्टी सांगितल्या. अजित पवार हे अर्थमंत्री आहेत, त्यामुळे अर्थमंत्र्यांचं कामच असतं की, कुठलीही फाईल आली की त्या फाईलमध्ये असं काहीतरी लिहायचं की ती फाईल फिरून पुन्हा त्याच ठिकाणी आली पाहिजे. त्यामुळे अजित पवारांनी बरोबर अर्थमंत्र्यांचं काम केलेलं आहे”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील चरित्रग्रंथाचा प्रकाशनाचा कार्यक्रम काल पार पडला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘योद्धा कर्मयोगी एकनाथ शिंदे’ या चरित्रग्रंथाचे ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे प्रकाशन सोहळा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कौटुंबिक वाटचाल, त्यांची जडणघडण, त्यांचा संघर्ष, कष्ट, त्यांचे राज्याच्या विकासातील योगदान या साऱ्याचा लेखाजोखा या ग्रंथात मांडण्यात आला आहे. या कार्यक्रमातच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भाषणातील विनोदी शैली पाहायला मिळाली.