अहमदनगरमध्ये असे काय सापडलं की पुरातत्वीय विभागाचे 50 प्रशिक्षणार्थी तज्ज्ञ संशोधन करतायत?
रायगडावर मागे एक दीड वर्षापूर्वी उत्खनन करत असताना शिवकालीन सुवर्ण होन सापडली होती. त्याचबरोबर तुटलेली सोन्याची साखळी, सोन्याची बांगडी आणि देवपूजेचं निरांजन सापडलं ज्याच्या संवर्धनाचे काम सुरू झाले.
अहमदनगर : राज्याच्या अनेक भागात सध्या पुरातत्वीय विभागाकडून उत्खनन केलं जात आहे. तर गडकोटांच संवर्धन केलं जात आहे. रायगडावर मागे एक दीड वर्षापूर्वी उत्खनन करत असताना शिवकालीन सुवर्ण होन सापडली होती. त्याचबरोबर तुटलेली सोन्याची साखळी, सोन्याची बांगडी आणि देवपूजेचं निरांजन सापडलं ज्याच्या संवर्धनाचे काम सुरू झाले. आता असाच ऐतिहासिक ठेवा हा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सापडला आहे. येथे दोन हजार वर्षापूर्वीची पुरातन व्यापारी बाजारपेठ आणि अनेक वस्तू संशोधकांना सापडल्या आहेत. त्यासाठी डेक्कन विद्यापिठाच्या पुरातत्वीय विभागाचे 50 प्रशिक्षणार्थी तज्ज्ञ संशोधन करत आहेत. यात अनेक पुरातन वस्तू सापडल्या असून शेकडो वर्षापूर्वीचा इतिहास उलगडणार आहे. कौतूळ येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी भाऊसाहेब देशभुख यांच्या शेतात हे उत्खननाचे काम सुरू आहे. तर गेल्या वर्षी काही अवशेष सापडल्याने त्यांनी पुन्हा उत्खननाचे काम सुरू केले असून पहिल्या आणि दुसर्या शतकातील वस्तू आणि बाजारपेठ त्यांना सापडलीय.