Ajit Pawar | मोदींचा पेट्रोल पंपावर फोटो, ते म्हणत असतील बघ तुझी कशी जिरवली : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरुन पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पेट्रोल पंपावर असलेल्या बॅनर्सवरुन अजित पवार यांनी मोदींना खोचक टोला लगावला आहे.
पुणे : इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारमधील नेते केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांवर अनेकदा हल्ला चढवताना पाहायला मिळतात. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरुन पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पेट्रोल पंपावर असलेल्या बॅनर्सवरुन अजित पवार यांनी मोदींना खोचक टोला लगावला आहे. यापूर्वीही जीएसटीच्या मुद्द्यावरुन अजित पवार यांनी केंद्र सरकारवर केली होती. ‘आम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून उत्तम प्रकारे काम करणारे अनेक पंतप्रधान आपल्या देशाला मिळाल्याचे पाहिले. आता पंतप्रधान पदावर मोदीसाहेब आहेत. त्यांनी अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी तेथे त्यांचा (मोदींचा) फोटो लावायचाच असा नियम केला आहे. त्यामुळे आम्ही गमतीने असे म्हणतो की, पेट्रोल 100 च्या पुढे गेलं. पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचं, मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली… घाल आता 100 रुपयाचे पेट्रोल!’, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. येथील एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.