शशिकांत वारिसे मृत्यूची चौकशी आता SIT मार्फत, देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना
एसआयटी स्थापन करून या प्रकरणाचा तपास करण्याच्या पोलीस प्रशासनाला फडणवीसांच्या सूचना
मुंबई : पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. वारिसे यांचा अपघात हा घातपात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत असताना यामागील मास्टरमाइंडचा शोध घेऊन त्याला शिक्षा द्या, अशी मागणीही विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी एसआयटी म्हणजेच स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम मार्फत करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरात लवकर एसआयटी स्थापन करून या प्ररकणाचा तपास करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. वारिसे यांच्या हत्येची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन देत हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात नेण्याचा प्रयत्न करू असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तर हे प्रकरण गंभीर असून ही हत्या करण्यामागे कोणाचा हात आहे? हत्या करणाऱ्यांचा नेमका हेतू काय आहे? याची सखोल चौकशी करू, असेही त्यांनी सांगितले आहे.