‘शरद पवार, उद्धव ठाकरे अन् काँग्रेसकडून जरांगे पाटलांनी लिहून घ्यावं, की…’, फडणवीसांचं आव्हान काय?
महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर ओबीसीतून आरक्षण देणार का? हे मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडून लिहून घ्यावं, असं देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान दिलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या भाजप बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांना एक आव्हान केले आहे. यावेळी ते म्हणाले, ‘एकच सवाल मी काँग्रेसला विचारला, शरद पवार यांना विचारला आणि उद्धव ठाकरे यांनाही विचारला यासोबत मी मनोज जरांगे पाटील यांनाही आव्हान केलं की, त्यांनी केवळ या तीन पक्षांना मदत करायची आहे तर त्यांनी या तीन पक्षांकडून लिहून घ्यावं ते निवडून आल्यानंतर ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देतील…कारण शरद पवार यांनी उघडपणे सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांची मागणी तर योग्य आहे. आरक्षण मिळालं पाहिजे पण इतरांचं कमी करू नका.. याचा अर्थ म्हणजे यात दुटप्पी भूमिका आहे. आता अशा दुटप्पी भूमिकेवाल्या लोकांना एक्सपोज केलं पाहिजे. कारण राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली, त्यात एका पत्रावर शरद पवारांसह अंबादास दानवे, नाना पटोलेंची सही आहे. या पत्रात आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसीतून नको असं म्हटलं आहे.’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.