भारत माता की, जय म्हणतो; इंडिया माता की नाही, देवेंद्र फडणवीस यांचा टोला
अमरावतीचा चेहरा बदलण्याचे काम करत आहोत. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर लोकांचं खूप प्रेम आहे. जे मोदी यांचं काम करतील त्यांना लोकं निवडून देतात. आमचं सरकार तुमच्यामागे उभा आहे, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
अमरावती, १० सप्टेंबर २०२३ : युवा स्वाभीमानी पक्षातर्फे दहीहंडीचा कार्यक्रम अमरावती येथे आयोजित करण्यात आला. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. शिल्पा शेट्टी, राजपाल यादव, खासदार अनिल बोंडे उपस्थित होते. या कार्यक्रमाता बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, फिल्ममध्ये काय केलं ते आपण बघीतलं. हे सगळे प्रयत्न करतात. अमरावती जिल्ह्याला मोदी सरकारने जे दिलं ते गेल्या ७० वर्षांत मिळालेलं नाही. भाजप सरकारने मेडिकल कॉलेज, विमानतळ, टेक्सटाईल पार्क दिला. टेक्सटाईल पार्कमधून तीन लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये क्रीडा विद्यापीठ होत आहे. रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ होत आहे. दोन हजार कोटी रुपये रस्त्याच्या कामासाठी दिले आहेत. तुकडोजी महाराज, गाडगेबाबा आणि प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांची प्रेरणा घेण्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. भारत माता की जय असं आपण म्हणतो. पण, इंडिया माता की जय म्हणत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा, नवनीत राणा, अनिल बोंडे यांनी अमरावतीसाठी केलेल्या कामाची स्तुती केली.