Special Report | देवेंद्र फडणवीसांच्या संन्यासाबाबतच्या वक्तव्यावरून चिमटे
सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण गेलंय, पण आमच्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.
भाजपने 26 जून रोजी ओबीसी आरक्षण पूर्ववत करावं यासाठी चक्का जाम आंदोलन केलं होतं. नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडलं. यावेळी फडणवीसांनी सरकारवर तुफान हल्ला चढवला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय, पण आमच्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. आता या वक्तव्यावरून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चिमटे काढायला सुरुवात केली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे लढवय्ये नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. त्यांना संन्यासाची भाषा शोभत नाही. ते फकीर होण्याची भाषा करत असतील तर मी स्वत: त्यांची भेट घेईन, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. तीन ते चार महिन्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करुन दिलं नाही तर राजकारणातून संन्यास घेईन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं.
संजय राऊत म्हणाले, “देवेंद्रजींना संन्यास घेऊ देणार नाही, त्यांची महाराष्ट्र, देशाला गरज आहे. त्यांची वीरक्तीची भाषा हा महाराष्ट्रावर अन्याय होईल. चांगल्या नेतृत्त्वाचा राजकारणात तुटवडा आहे. देवेंद्र फडणवीसांसारख्या हरहुन्नरी नेत्यांना फकीर होण्याची भाषा योग्य नाही. फडणवीस लढवय्ये नेते आहेत”
बाळासाहेब थोरातांचा टोला
सत्तेसाठी काहीही बोलायचं
सत्तेसाठी काहीही बोलायचं, नंतर कृती करायची नाही, हा भाजपचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. जनमाणसाला फसवणं आणि सत्ता मिळवणं हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र त्यानंतर काय झालं आपण सर्वांनी पाहिलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
विश्वामित्रने ब्रम्हचर्य भंग करून मेनकेशी लग्न केले, हा तसाच प्रकार
फडणवीस यांनी राजकारणातून संन्यास घेऊ नये, ते विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम काम करत आहेत, त्यांनी 5 वर्षे सरकारला सूचना कराव्यात, असा सल्ला एकनाथ खडसे यांनी दिला. देवेंद्र फडणवीस वारंवार अशा घोषणा करतात. वेगळा विदर्भाच्या मुद्द्यावर त्यांनी आपण लग्न करणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा केली होती. पण त्यांनी लग्न केले. असा प्रकार आपण पुराणात पाहिला आहे. विश्वामित्रने ब्रम्हचर्य भंग करून मेनकेशी लग्न केले होते. तसा हा प्रकार आहे. त्यानंतर फडणवीस यांनी राष्ट्रवादीशी युती करणार नाही, असे सांगितले होते. पण पहाटे शपथ घेतली. आता ते सत्ता दिली तर ओबीसींना आरक्षण मिळवून देऊ म्हणतात, सत्ता नसेल तर मदत करणार नाही, असे वाटते, असं एकनाथ खडसे म्हणाले.