धुळे महापालिका ठरली महिलाराज असलेली पहिली महापालिका, महापौरपदी कोण?
VIDEO | धुळे महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सभापतीपदी महिलांची निवड
धुळे : धुळे महानगरपालिकेमध्ये महिला राज आले आहे. महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सभापतीपदी महिलांची निवड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या महापालिकेत विरोधी पक्ष नेत्या देखील महिलाच आहेत. त्यामुळे राज्यात बहुधा महिलाराज असलेली पहिली एकमेव महापालिका धुळे महापालिका ठरली आहे. महापौरपदी प्रतिभा चौधरी या कार्यरत असून आता उपमहापौरपदी वैशाली वराडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपमहापौर पदाचा राजीनामा नागसेन बोरसे यांनी दिल्यानंतर या ठिकाणी वैशाली वराडे या उपमहापौर झाल्या आहेत. सत्ताधारी भाजपने महानगरपालिकेचा कारभार महिलांच्या हाती सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता धुळे महानगरपालिकेमध्ये संपूर्णपणे महिलाराज सक्रिय झाल्याचं सांगायला हरकत नाही. यात महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर पदी वैशाली वराडे, स्थायी समिती सभापतीपदी किरण कुलेवार, महिला बालकल्याण सभापतीपदी सारिका अग्रवाल, उपसभापतीपदी पाटील, सभागृह नेते पदी भारती माळी यांची निवड भाजपाने केली आहे. तर दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष नेते म्हणून राष्ट्रवादीच्या महिला नगरसेविका कल्पना महाले या विरोधी पक्ष नेत्या त्यामुळे एकूणच या महापालिकेत महिलाराज आला आहे. मात्र महिलांनी आता धुळेकर महिलांचे प्रश्न जाणून घ्यावे आणि पाण्याचा आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा सर्वसामान्य धुळेकर महिलांनी व्यक्त केली आहे.