देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले विनायक राऊत
कोकणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचा दौरा झाल्यानंतर कोकणातील जागांसंदर्भात शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. कोकणातील चिपळूण वगळता सर्वच जागांवर शिवसेना इच्छुक असल्याचे राऊत यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूकांची घोषणा केव्हाही होईल अशी परिस्थिती आहे.या संदर्भात विविध पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी आणि जागा वाटपाची चर्चा सुरु आङे. या संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी सांगितले की येत्या काही दिवसात महाविकास आघाडीतील जागांची बोलणी अंतिम होऊन दसऱ्याच्या मुहूर्ताला जागा वाटप जाहीर होईल असेही राऊत यांनी सांगितले. चिपळूण सोडले तर सर्व जागांवर शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षांचे आमदार आहेत तेथ आमचा क्लेम आहे असेही त्यांनी सांगितले. उदय सामंत यांच्या विरोधात आमच्याकडे राजू महाडीक आणि उदय बने असे ताकदवान उमेदवार असून ते त्यांचा नक्कीच पराभव करतील असेही त्यांनी सांगितले.देवेंद्र फडणवीस रात्रीचं गुपचुप येऊन उद्धव ठाकरे यांना भेटल्याचे वृत्त आहे याबाबत पत्रकारांनी विचारले असता राऊत यांनी सांगितले की आजच्या स्थितीत तरी उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटणे कदापि शक्य नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शाह चर्चेला कधीही तयार आहेत. जर उद्धवना चर्चा करायची असती तर त्यांनी शाह आणि मोदी यांच्याशी चर्चा केली असती असेही राऊत यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत संम्रभ निर्माण होण्यासाठी अशा वावड्या मुद्दामहून भाजपातील लोक उडवत असतात असेही राऊत यांनी सांगितले.