जागावाटपावरून ठाकरे गट अन् नाना पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी, नेमकं काय घडलं?
ठाकरे गट आणि नाना पटोले यांच्यातील वाद काही नवा नाही. याआधीदेखील त्यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले होते. महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील तर यापुढे बैठकीला जाणार नाही, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली असून ठाकरे गटाने अधिकृतपणे आपली भूमिका जाहीर केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीचा जागावाटपाचा वाद टोकाला पोहोचला आहे. जागावाटपावरून ठाकरे गट आणि नाना पटोले यांच्यामध्ये जबरदस्त वाद पेटला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील तर महाविकास आघाडीच्या बैठकीत यापुढे जाणार नाही, अशी जाहीर भूमिका ठाकरे गटाने घेतल्याचे पाहायला मिळत आहे. विदर्भातील जागा वाटपावरून ठाकरे गट आणि नाना पटोले यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. या वादावर भाष्य करण्यास नाना पटोले यांनी नकार दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार विदर्भातील जागांवर नाना पटोले हे तडजोड करत नसल्याने हा वाद सुरू आहे. ठाकरे गटाला विदर्भात ९ जागा हव्या असल्याने हा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, नाना पटोले ठाकरे गटाला फक्त ४ जागा देण्यास तयार आहेत. मात्र तर आज झालेल्या महाविकासआघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीला ठाकरे गटाने दांडी मारल्याचे पाहायला मिळाले. तर नाना पटोलेंच्या या भूमिकेनंतर ठाकरे गट नाना पटोलेंची तक्रार हायकंमाडकडे करणार आहे.