अमित ठाकरेंवरुन शिंदेंच्या शिवसेनेतच जुंपली; माघार नाही, अर्ज भरणारच… सदा सरवणकर विधानसभा लढण्यावर ठाम
माहिममध्ये अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याची भूमिका भाजपने घेतले. त्यावरून शिंदेंची मंत्री दीपक केसरकरांनी सदा सरवणकरांना माघार घेण्याची विनंती केली. मात्र सदा सरवणकर आपल्या निर्णयावर ठाम असून दीपक केसरकरांनीच आपला मतदारसंघ मनसेला सोडावा असा निशाणा साधला आहे.
माहिममधून राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांनी विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राज ठाकरे यांच्या उपस्थिती अमित ठाकरे यांनी आपला अर्ज भरलाय. पण महायुतीच्या पाठिंब्यावरून सस्पेन्स कायम आहे. कारण शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत. आपल्यालाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्ज मागे घेण्यास सांगितलं नाही त्यामुळे अर्ज भरणार असल्याचे सदा सरवणकर यांनी म्हटले. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत केली म्हणून त्यांना आता मदत करावी हे कर्तव्य असल्याचे दीपक केसरकर म्हणाले. मात्र केसरकर यांच्या वक्तव्यानंतर सदा सरवणकर आणि त्यांच्यातच जुंपली आहे. दीपक केसरकरांनीच आपला मतदारसंघ मनसेला सोडावा आणि मनसेला पाठिंबा द्यावा, असे म्हणत सदा सरवणकरांनी निशाणा साधलाय. अशातच काल सदा सरवणकर यांच्या मुलाकडून एक स्टेटस ठेवण्यात आलंय. ज्यात ‘आमदार सदा सरवणकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या सकाळी सर्वांनी शाखा क्रमाकं १९४ सामना प्रेस प्रभादेवी येथे उपस्थित रहावे’, असे म्हटलेय. त्यामुळे सरवणकर माहिममधून माघार घेणार नसल्याचे चित्र दिसतेय.