‘या माझ्या रेड्यावर…’, डोंबिवली रेल्वे स्थानकात यमराज, नेमकं काय केलं प्रवाशांना आवाहन?
डोंबिवली रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या रेल्वे प्रवाशांना यमराज रेड्यावर बसण्याची जागा देतोय. रेल्वे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी डोंबिवलीच्या लोहमार्ग पोलिसांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे. भिंतीवर यमराजाचे चित्र रेखाटून रूळ ओलांडू नका, पदचारी पुलाचा वापर करा, अस संदेश लोहमार्ग पोलिसांकडून देण्यात येतोय
डोंबिवली रेल्वे स्थानक सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी लोकल पकडण्याच्या घाई गडबडीत अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडताना दिसतात. यामध्ये काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काही जेष्ठ नागरिक सुद्धा फलाट बदलण्याच्या गडबडीत रेल्वे रूळ ओलांडताना दिसत आहेत. रेल्वे प्रवाशांनी आपले अनमोल आयुष्य धोक्यात टाकू नये, त्यासोबतच अपघाताचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने डोंबिवलीच्या लोहमार्ग पोलिसांच्या टीमने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमा अंतर्गत प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात आली. रेल्वे रूळ ओलांडू नका, अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली असून रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना यमराज रेड्यावर बसण्याची जागा देत असल्याचे भिंतीवर चित्र काढण्यात आलंय. तर रेल्वे रूळ ओलांडून नागरिकांनी आपले आयुष्य धोक्यात टाकू नये या संबंधात चित्र आणि संदेशाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.