कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये धुवाँधार पाऊस, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ, अनेक बंधारे ही पाण्याखाली
जिल्ह्यात सुरू असणाऱ्या धुवाँधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.
कोल्हापूर, 19 जुलै 2023 | कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये सर्वदूर सुरु पावसाने आता एका महिन्यानंतर जोरदार सुरूवात केली आहे. जिल्ह्यात सुरू असणाऱ्या धुवाँधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. तर गेल्या दोन दिवसापासून कोल्हापुर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत रात्रीत तीन फुटाची वाढ झाली आहे. यादरम्यान राजाराम बंधाऱ्यासह 11 बंधारे पाण्याखाली गेल्याने जिल्ह्यातील प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. तर गडहिंग्लज, आजरा, चंदगड, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी तालुक्यात धुवाधार पाऊस झाल्याने तेथील धरणाच्या पाणीसाठ्यात देखील कमालीची वाढ झाली आहे. तर राधानगरी धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरणातून 700 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. तर नदी किनारी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.