Badlapur Rain | मुसळधार पावसामुळे बदलापूरच्या उल्हास नदीकिनाऱ्यावर असलेली चौपाटी पाण्याखाली
कालपासून सुरू झालेल्या पावसाने आजही संपूर्ण ठाणे जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्याची दाणादाण उडाली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे बदलापूरच्या उल्हास नदीकिनाऱ्यावर असलेली चौपाटी पाण्याखाली गेली आहे.
कालपासून सुरू झालेल्या पावसाने आजही संपूर्ण ठाणे जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्याची दाणादाण उडाली आहे. कल्याण-डोंबिवलीत अतिवृष्टी झाल्याने वालधूनी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. तर उल्हास नदीला पूर आला आहे. बदलापूरमध्येही पूरस्थिती निर्माण झाली असून प्रशासन अलर्ट झालं आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे बदलापूरच्या उल्हास नदीकिनाऱ्यावर असलेली चौपाटी पाण्याखाली गेली आहे. (Due to heavy rainfall, Chowpatty on the banks of Ulhas river in Badlapur is under water)
कल्याण-डोंबिवलीत अतिवृष्टी
कल्याण-डोंबिवलीत गेल्या 24 तासात 177 मिली मीटर पाऊस पडला आहे. ही अतिवृष्टी आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. काही झोपडपट्टी परिसरातही पाणी साचले आहे. नागरिकांची इतरत्र राहण्याची व्यवस्था केली जात आहे. रात्री नऊ वाजता 2.5 मीटरची भरती येणार आहे. त्याचा परिणाम होणार आहे. त्यासाठी लोलाईन एरियातील नागरीकांना स्थलांतरीत करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती कल्याण-डोंबिवली पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
वालधूनीचं पाणी घरात
अतिवृष्टीमुळे कल्याणच्या वालधूनी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे कल्याण पश्चिमेतील वालधूनी, अशोकनगर, शिवाजी नगर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे या परिसरातील शेकडो लोकांना इतरत्रं हलविण्यात आलं आहे.
डोंबिवलीत हिरवा नाला
डोंबिवलीत एका केमिकल कंपनीने नाल्यात केमिकल सोडल्याने नाल्याचा प्रवाह हिरवा गार झाला होता. त्यामुळे परिसरातील रहिवाश्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र, पालिका आयुक्त सूर्यवंशी यांनी या कंपनी विरोधात मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली आहे. एमआयडीसीकडून रायबो कंपनीचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात आहे. प्रदूषण मंडळाने कंपनीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
कल्याणी येथे रस्ता खचला
कल्याण-डोंबिवलीत सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. रात्री जोरदार पावसामुळे टिटवाळा-कल्याण या मुख्य रस्त्यावर कल्याणी येथे रस्त्याचा काही भाग खचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. आजूबाजूच्या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते आणि या पाण्यामुळे हा रस्ता खचल्याची माहिती महापालिकेचे अधिकारी राजेश सावंत यांनी दिली.
काळू नदीवरील पूल पाण्याखाली
टिटवाळ्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे येथील काळू नदीवरील रुंदे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे येथील गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला आहे, अशी माहिती टिटवाळा पोलिसांनी दिली आहे.
अंबरनाथच्या शिवमंदिर परिसरात नदीला पूर
अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधूनी नदीला आज सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या बाहेर तर या नदीने अक्षरशः रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळतंय. वालधुनी नदी अंबरनाथ जवळच्या तावलीच्या डोंगरात उगम पावते. कालपासून डोंगरपट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने अनेक धबधबे प्रवाहीत झाले असून या नदीत पाण्याचा मोठा प्रवाह आला आहे. ही नदी अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातून वाहत असून अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या अगदी बाजूनेच वालधुनी नदी वाहते. या नदीला आलेल्या मोठ्या प्रवाहामुळे काही काळासाठी शिवमंदिरात जाणारे पूल सुद्धा पाण्याखाली गेले होते. सकाळपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. त्यामुळे नदीचा प्रवाह सुद्धा कमी झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला असून त्यामुळे वालधूनी नदीला पूर आला आहे.
कळव्यात कमरेएवढं पाणी
कळवा येथे काल दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सकाळी पावसाने काही काळासाठी विश्रांती घेतली होती. मात्र दुपारनंतर मुसळधार पाऊस सुरू झाल्याने कळवा येथील न्यू शिवाजी नगर या परिसरात कमरे एवढं पाणी साचलं आहे. या शिवाजी रोड शेजारील भला मोठा नाला ओसंडून वाहू लागल्याने परिसरात कमरे एवढे पाणी साचले आहे. या कमरे इतक्या पाण्यात काही तरुण मस्ती करताना पहायला मिळत आहे. तर लोकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे स्थानिक रहिवासी आणि दुकानदार त्रस्त झाले आहेत.
संबंधित बातम्या:
Mumbai Rains Live Updates | मुंब्रा शीळ फाटा ते पनवेल-हायवे वाहतुकीसाठी बंद
Mumbai Rain : कुठे भिंत तर कुठे दरड कोसळली, गेल्या 24 तासांत मुंबईत 33 जणांचा मृत्यू