तुम्ही नक्की कोणता लसूण खाताय? असली की नकली? सिमेंटच्या लसणाचा VIDEO पाहून भरेल धडकी
सर्वसामान्यांच्या घरात कांदा, बटाटा यानंतर गरजेचा पदार्थ म्हणून लसूण हा असतोच... मात्र सध्या कांद्या बटाट्यासोबच लसणाचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. किलोभर लसूण घेणं देखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. अशातच अकोल्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अकोल्यात लसणाचा काळाबाजार करण्यांची डोकं लढवून नागरिकांची मोठी फसवणूक केली आहे. अकोला शहरात बऱ्याच ठिकाणी फेरिवाले डुप्लिकेट लसूण विकत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अकोला शहरातल्या बाजोरिया नगरमध्ये राहणारे सुधाकर पाटील यांच्या घरी हा सिमेंटचा लसूण आढळला आहे. घरातला लसूण संपला म्हणून त्यांच्या पत्नीने फेरीवाल्याकडून लसूण विकत घेतला. भाजीला फोडणी द्यायची म्हणून तो लसूण निवडण्यासाठी हातात घेतला, मात्र बघतात तर तो लसूण निवडलाच जात नव्हता त्याच्या पाकळ्या सुद्धा वेगळ्या होत नव्हत्या, त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की तो लसूण चक्क सिमेंटचा आहे. गेल्या काही दिवसांपासून अन्नामध्ये भेसळीचे प्रमाण वाढले आहे त्यातच अकोल्यात अशा बनावट लसणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरी यानंतर लसूण विकत घेताना खबरदारी घ्यावी असे आवाहन सुद्धा सुधाकर पाटील यांनी केले आहे.